मराठी गझल :

अंतास आज माझ्या टाळू नकोस आई .........

पाहून रक्त माझे हारू नकोस आई
लाचार या जगाशी भांडू नकोस आई

ही आसवे मनाची बघणार कोण आता
झाकून ठेव यांना सांडू नकोस आई

हो धाडशी मनाने खंबीर हो उभी तू
पायात तू कुणाच्या वाकू नकोस आई

खाऊन वाळलेली भाकर जगून घे गं
स्वप्नात तूप पोळी लाटू नकोस आई

वाहून शेत माळी अर्थास अर्थ नाही
शेतीत घाम आता टाकू नकोस आई

मी भांडलो कितीही वैरीच राजनीती
ही झुंज वादळाशी पाहू नकोस आई

घेवून संप मागे टांगून घेतले मी
मागून फास माझ्या घालू नकोस आई

देतील बाद माझ्या सरकार कर्जमाफी
खोटेच हे दिलासे भाळू नकोस आई

जातो अखेर आता कर मोकळे शशी ला
अंतास आज माझ्या टाळू नकोस आई
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
बोलू नये .........

तो शहाणा मंदिरांना घाण म्हणतो
मी जरासा शांत त्याला छान म्हणतो

वाटले त्याला कदाचित मी तयाचा
मी दिलेल्या वावला तो मान म्हणतो

मागताना भीक त्याचा जन्म गेला
मी दिलेल्या आसरा मी दान म्हणतो

त्रास व्हावे मंदिराने का कुणाला
का तयाने सोडिले हे बाण म्हणतो

मी कधी ना काढली जाती कुणाची
जाणुनी तो का स्वतःला हान म्हणतो

मी जरी चुपचाप येथे पाहतांना
ठेव त्याला बोलतांना भान म्हणतो
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
तू दिवा मी पेटणारी .........

का मला छळते अशी ही रात आहे
शोधतो माझ्यात का तू जात आहे।।

खूप झाले वाद आता बंद व्हावे
माणसांना तोडण्या हे घात आहे।।

धर्म जाती का तरी घेऊन चालू
एकतेचे गीत मी हे गात आहे।।

आपली सोडून आता जात देऊ
हीच माझी शेवटीची बात आहे।।

आग केली खूप राया जीवघेणी
शांततेचे सार संगीतात आहे।।

ये उभा हो संगतीने यार माझ्या
रंगले वादात सारे हात आहे।।

मी तुझा भाऊ सख्या मानून घे तू
तू दिवा मी पेटणारी वात आहे।।
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
माणूस .........

माणूस माणसाच्या अंतास राज आहे
जे रेखिले पुराणी सत्यास साज आहे

ही भूक माणसाची भागेल ना कधीही
तो लागला मिटाया त्याचीच माज आहे

येतो उगाच आता पाऊस हा अवेळी
वाटे जणू सरींना पडण्यास लाज आहे

रानातल्या फुलांचा तोडून नाश झाला
गावी जनावरांचा मुक्काम आज आहे

शोधू कुठे किनारा जगण्यास मानवांना
स्वार्थात माणसाचे सारेच काज आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
खोटा पलाश आहे .........

माझाच तो इशारा माझाच नाश आहे
माझाच हात देवा आता हताश आहे

देहात भेटला हा स्वार्थीच प्राण देवा
स्वार्थात भांडता मी पाडीत लाश आहे

देशील का मला तो निस्वार्थ प्राण आता
जातीत माणसाच्या काळा प्रकाश आहे

जाणार का उराशी ही जात माणसाच्या
ही जात जात नाही जातीस पाश आहे

प्रेमात जात आहे जातीत प्रेम नाही
रानात आज बाकी खोटा पलाश आहे
---------------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
सांग देवा तू .........

भार का हा सोसवेना सांग देवा तू
घात झाला का मनाचा सांग देवा तू

मीच आता खेळ झाले जीवनाची या
हा रवी का कोपला रे सांग देवा तू

झोपला रे बाळ माझा हा उपाशी का
मारला ना बाप याचा सांग देवा तू

साथ नाही सावराया माय बाकी मी
का नशिबी ही गरीबी सांग देवा तू

हा शशी का बोलतो की देव नाही तू
तो खरा की मी ख़री हे सांग देवा तू
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
माझी ही कहानी .........

मीच केली माज माझी ही कहानी !
लिहतो मी आज माझी ही कहानी !!

भावना या थांबतांना का पळाल्या !
राख झाली मानवाची ही कहानी !!

स्वार्थ माझा पाडतो नात्यात भेगा !
विकली पैशात आता ही कहानी !!

लाख केले ख़ाक झाले वीर सारे !
का मरुणी दान केली ही कहानी !!

माणसांनो मी तुम्हाला लाच देतो !
द्या करुनी पूर्ण माझी ही कहानी !!

मानवाचा शोध घेता जा शशि तू!
चांदणी सांगेल माझी ही कहानी !!
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
प्रीत माझी ही अधूरी .........

प्रीत माझी ही अधुरी राहली कशी !
घात केला का कुणी ती राहली अशी!!

घाव पाठी ओठ मीठे प्रीत कापली!
काय झाला फायदा ती राहली अशी !!

श्वास माझा थांबला का या हृदयी !
काळजाला भिडली ती राहली अशी !!

मानला मी प्राण ज्याला या जीवनी !
सोडला का श्वास आणि राहली अशी !!

आसवांनी सांझ होता रडतो 'शशि' !
आठवाया का अधूरी राहली अशी !!
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************


No comments: